पाक्षिक म्हणून सुरू झालेल्या ‘लोकभूमी’चा पहिला अंक 1 मे 1983 रोजी निघाला. पहिल्या अंकावर कार्यकारी संपादक म्हणून रमेश कोलवाळकर यांचे नाव आहे. अंकाची किंमत 50 पैसे आहे. 24 पानी हा अंक आहे. त्यावर कार्यालय म्हणून रोशन मंजिल, 3रा मजला, सिने नॅशनल जवळ, पणजी - गोवा असा कार्यालयी पत्ता आहे. (अद्यापही हाच कार्यालयीन पत्ता असतो.). अंक बेळगाव येथील रवि मुद्रणालयात छापलेला आहे.(अजूनही अंक याच मुद्रणालयात छापला जातो.).

दुसर्‍या वर्षापासून नारायण देसाई यांचे संपादक म्हणून व रमेश कोलवाळकर यांचे कार्यकारी संपादक म्हणून नाव छापलेले दिसते. 1989पासून केवळ ‘कार्यकारी संपादक : रमेश कोलवाळकर’ असे आहे.

पहिल्या अंकाच्या पहिल्या पृष्ठावर ‘आपणा सर्वांचा आशिर्वाद हवा !’ या शीर्षकाचे आवाहन वजा टिपण आहे. त्यात म्हटले आहे - 

‘...भारतभूमी सर्वार्थाने लोकभूमी होऊ पहात आहे. हे एवढे मंथन चाललेलें असतानाच प्रधानमंत्र्यांनी इशारा दिल्याप्रमाणें देशाची एकता, अखंडता व सामर्थ्यसंपन्नता हे आपले आधारबिंदू आहेत याची जाणीव सतत जागृत राहिली पाहिजे. ती तशी राहिली नाही तर देशाचे हितशत्रू या मंथनाचा गैरफायदा घेतील व त्यामुळें आपल्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण होईल. हें टाळण्याकरता आज चालत असलेल्या ध्येय मंथनाची गति व शक्ति क्षीण होऊं नये म्हणून प्रयत्न करतानाच आपल्याकडून देशाच्या स्वातंत्र्याची व अखंडत्वाची जोपासना तेवढ्याच निष्ठेनें होत राहिली पाहिजे.
‘लोकभूमी’ या ऐतिहासिक प्रक्रियेला वाहिलेले पाक्षिक आहे. पाक्षिकाच्या चालकांना व कार्यकर्त्यांना आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव असली तरी, त्यांना आपल्यापुढील कार्याची महानता उत्साहित करीत आहे. कुवतीप्रमाणें पाऊल पडेल. कदाचित तें तोकडेही असेल. परंतु ते नेहमी पुढेंच पहावें, हटूं नये की थांबूं नये. यासाठी आपणा सर्वांचा आशिर्वाद हवा आहे.’

‘लोकभूमी’चे सुरूवातीचे अंक हे मुख्यत: देश-विदेशातील घडामोडींची चर्चा करणारा मजकूर प्रकाशित करणारे आहेत. डाव्या, साम्यवादी विचारधारेची कास धरलेले हे नियतकालिक असल्याचेही स्पष्टपणे जाणवावे अशी त्याच्या अंकातील मजकुराची मांडणी आहे. 'मास्ट हेड'चा रंग लाल आहे, हा काही निव्वळ योगायोग नसावा. संपादकही स्वतः कॉमरेड.   सोवियेत संघातील (यूएसएसआर) घडामोडींची माहितीही ‘लोकभूमी’तून दिली जात असे. शिवाय कामगार व मध्यमवर्गीय यांना सहायक ठरणारी माहिती, योजना यांबाबत छापलेले दिसते. उदाहणार्थ कामगार विमा योजना, गृहबांधणी सहाय्य योजना इत्यादी. एका अंकात वेगवेगळे लघुद्योग-गृह उद्योग यांची एक दीर्घ यादीच प्रकाशित केलेली आहे. सुरुवातीच्या वर्षांतील एका अंकात वर्गणीदारांना आवाहन करणारी एक जाहिरात आहे. त्यात 'लोकभूमी'चा परिचय - 'राष्ट्रीय विकासाच्या सर्वांगीण माहितीसाठी - आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या योग्य आकलनासाठी' असा करून देण्यात आला आहे. 
एका जुन्या अंकातील जाहिरात 

‘लोकभूमी’च्या अंकात ‘संपादकीय’ असे दिसत नाही. शीर्षक पृष्ठ हे सामान्यत: लेखाचे असते. काहीवेळा वृत्तांतही शीर्षक पृष्ठावर दिसतात. (उदा. गोव्यातील कार्यक्रमात नारायण सुर्वे यांच्या भाषणाचा वृत्तांत, ‘गोर्बाचेव भेटीची स्वागतार्ह फलश्रुती’ हे गोर्बाचेव यांच्या भारत भेटीची चर्चा करणारा लेख). एका अंकात भारतीय आरमारी नाविकांनी 1946 साली ब्रिटीशांविरुद्ध केलेल्या उठावाच्या स्मृतिदिनानिमित्त दीर्घ कविता शीर्षकपृष्ठावर दिसते.

काही वर्षे प्रारंभीचा पहिला लेख वामन सरदेसाई यांनी लिहिलेला दिसतो. चालू घडामोडी, व्यक्ती, समाजवाद इत्यादी विषयांवरील त्यांचे हे लेख दिसतात. अंकाला गोवा तसेच महाराष्ट्र सरकारच्या जाहिरातील लाभलेल्या दिसतात. त्याशिवाय डाव्या विचारसरणीशी निगडित साहित्याच्या जाहिराती तसेच सोवियेत संघाशी संबंधित साहित्याच्या जाहिराती आढळतात. 

अगदी सुरुवातीपासून ‘लोकभूमी’ने गोव्याशी व देशाशी संबंधित काही महत्त्वाच्या दिवसांत निघणारे अंक ‘विशेषांक’ म्हणून प्रकाशित केल्याचे दिसते. ‘प्रजासत्ताकदिन विशेषांक’, ‘गोवा क्रांतिदिन विशेषांक’, ‘गोवा राज्य वर्धापनदिन विशेषांक’, ‘स्वातंत्र्यदिन विशेषांक’, ‘कामगारदिन विशेषांक’, ‘गोवा मुक्तिदिन विशेषांक’ असे हे ‘विशेषांक’ आहेत.

गोवा क्रांतिदिन विशेषांकात, त्या त्या क्रांतिदिनी ज्या निवडक स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार होतो त्यांचे परिचय छापलेले दिसतात.

सुरुवातीच्या वर्षांमध्ये 'लोकभूमी'ने नियमित दिवाळी अंक प्रकाशित केल्याचे दिसतात.  

‘लोकभूमी’च्या दिवाळी अंकांचे स्वरूप नियमित अंकांपेक्षा निराळे दिसते. कथा-कवितांचा इ. साहित्यिक मजकूर बर्‍यापैकी आहे. शिवाय चर्चात्मक - माहितीपर लेख, ललित लेख दिवाळी अंकांत दिसतात. एका दिवाळी अंकांत अनुवादित आफ्रिकन कविता छापलेल्या आहेत.

साहित्यविषयक लेखही ‘लोकभूमी’तून दिसतात. साहित्यकृतींची परीक्षणे छापलेली दिसतात. काही साहित्य संमेलनांतील भाषणेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. एका साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण सविस्तरपणे दोन अंकांत छापले आहे. पण मुख्यत: सामाजिक-राजकीय विषयांवरील लेखच अधिक दिसतात.

‘लोकभूमी’त लेखन केलेल्या गोमंतकीय लेखकांत र.वि.पंडित, वामन सरदेसाई, मनोहर हि. सरदेसाई, अर्जुन जयराम परब, बा. द. सातोस्कर, ज्ञानेश्‍वर कोलवेकर, रघुनाथ टोपले, यज्ञेश्‍वर निगळ्ये असे लेखक दिसतात. नंतर पुस्तके निघाली असे दादू मान्द्रेकर, देवेंद्र कांदोळकर यांचेही लेखन जुन्या ‘लोकभूमी’च्या अंकांत दिसते. 

देश-विदेशातील राजकीय घडामोडींशिवाय विचारप्रवर्तक लेखन प्रकाशित करण्याकडे ‘लोकभूमी’चा कल दिसतो. वैज्ञानिक, आधुनिक दृष्टिकोन विकसित करणारे, ऐतिहासिक विषयांची चर्चा करणारे, व्यक्तिमत्त्वांवरील असे माहितीपर-वैचारिक लेख ‘लोकभूमी’तून दिसतात. प्रा. डॉ. प्रभा गणोरकर यांचा ‘विवाह : स्त्रीजीवनविषयक दृष्टीकोनानूत काही विचार’ लेख, ‘शिवाजीचे मुस्लिम साथीदार’ हा लेख, कुमार केतकर यांचा ‘’आणिबाणिच्या तथ्यांची चिकित्सा करणारा लेख, मनोहर हि. सरदेसाई यांचा ‘टागोर आणि रशिया’ व अन्य व्यक्तींवरील लेख, अशी काही उदाहरणे देता येतील.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ‘लोकभूमी’ने त्यांच्यावर विशेषांक प्रकाशित केला. शिवाय ‘लोकभूमी’ने मनोहर हिरबा सरदेसाई यांची ‘इंदिरा प्रियदर्शिनी’ ही लेखमालाही चालविली.

90च्या दशकात ‘लोकभूमी’त साम्यवादी पक्षाशी संबंधित साहित्य सुरुवातीच्या वर्षांप्रमाणे दिसत नाहीत.  विविध लेख लोकभूमीतून दिसतात. या लेखांचे विषय प्रबोधनात्मक व पुरोगामी स्वरूपाचे आहेत. काही अन्य प्रकाशनांतील लेख (मूळ व अनुवादित) प्रकाशित केलेलेही दिसतात.

अंकाची सुरुवात झाली त्यावेळी त्याचे स्वरूप हे ‘राजकिय पत्र’ असे होते. केवळ राजकीय चर्चांपूरते ‘लोकभूमी’ला मर्यादित करण्यापेक्षा प्रबोधनात्मक साहित्य प्रकाशित केल्यास ते जास्त उपयोगी व टिकावू ठरेल असे चालकांना ते सुरू केल्याच्या 4  वर्षांनंतर वाटले व त्यामुळे हळुहळु संग्राह्य व विचारप्रवर्तक असे पुरोगामी-प्रबोधनात्मक साहित्य प्रकाशित करण्याचे धोरण ‘लोकभूमी’ने स्वीकारले, असे कार्यकारी संपादक रमेश कोलवाळकर सांगतात.

हे सर्व विवरण 2004 पर्यंतच्या ‘लोकभूमी’चे आहे.

2007 पासून व्यक्तिविशेषांक प्रकाशित करण्याकडे विशेष लक्ष ‘लोकभूमी’ने दिले आहे. असे व्यक्तीविशेषांक जे या ब्लॉगकर्त्याला पाहता आले किंवा ज्यांच्याबद्दल संपादकांकडून माहिती मिळाली त्यांची सूची या टिपणाच्या शेवटी दिली आहे.

व्यक्तिविशेषांकांसाठी ‘व्यक्ती’चे पुरोगामीत्व, त्याने केलेले प्रबोधनाचे कार्य हे प्रामुख्याने पाहिले जातात. व्यक्तिविशेषांक काढायचे ठरवल्यानंतर व्यक्तिविषयक जास्तीत जास्त संदर्भयुक्त असे माहितीपर लेखन जमवले जाते. 

‘संत तुकाराम’ व ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ विशेषांकही ‘लोकभूमी’ने काढले. ‘सावरकर’ विशेषांकानंतर संमीश्र प्रतिक्रियांचा सामना विशेषत: संबंधित विचारधारेच्या मंडळींकडून करावा लागला, असा संपादकांचा अनुभव आहे.

‘लोकभूमी’च्या एकूण कारकिर्दीचा विचार करता या नियतकालिकाची सुरुवात साम्यवादी पक्षाशी संबंधित पत्र म्हणून झाली असली तरी पुढे  व्यापक प्रबोधनात्मक व पुरोगामी वाटचाल केली असे म्हणता येईल. नियतकालिकातील लेखांचे विषय पाहिल्यासही ते दिसून येईल. केवळ लेनिन, मार्क्स नव्हेत; महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘संत तुकाराम’ इ. ‘लोकभूमी’चे विषय झालेले आहेत. केवळ समाजवाद-साम्यवादच नव्हे हिंदुत्वावरील तसेच हिंदु व इतर धर्माविषयी चर्चा करणारे लेखनही लोकभूमीत झाले आहे. साम्यवादी पक्षाबरोबर इतर पक्षांबद्दलचे लेखही दिसतात. असाच काँग्रेस पक्षाच्या शताब्दीच्या निमित्ताने लिहिलेला एक लेख ‘लोकभूमी’त आहे.

सध्या ‘लोकभूमी’च्या प्रकाशनात नियमितता राहिलेली नसली तरी कार्यकारी संपादक रमेश कोलवाळकर हे जिद्दीनेे शक्य तेवढे अंक निघावेत यासाठी प्रयत्नशील दिसतात. आता ‘लोकभूमी’ला सुरूवातीच्या काळाप्रमाणे जाहिरातीही राहिलेल्या नाहीत. हितचिंतकांचा परिवार मात्र नेहमी पाठिंबा देत असतो.
अलिकडच्या काळातील अंकांवर सहायक संपादक म्हणून प्रकाश मुचंडी यांचे नांव छापलेले दिसते.

इतर कार्य
‘लोकभूमी’ने ग्रंथप्रकाशन केल्याचेही दिसते. नशामुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, कृषी, पुरोगामी-प्रबोधनात्मक असे या ग्रंथांचे विषय दिसतात. ‘लोकभूमी’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची यादीही लेखाच्या शेवटी दिली आहे.

*****
( टीप :‘लोकभूमी’चा हा काही समग्र आढावा किंवा संपूर्ण कार्याची समीक्षा नव्हे. ‘लोकभूमी’च्या काही टप्प्यांना अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न. या पाक्षिकाची ओळख करून देणे हा या टिपणाचा व एकूणच ब्लॉगचा हेतू. ‘लोकभूमी’चे उपलब्ध झालेले अंक आणि संपादक रमेश कोलवाळकर यांच्याशी चर्चा या संदर्भांवर हे टिपण बेतलेले आहे. )

*****परिशिष्ठ  १
व्यक्तीविशेषांक सूची


प्रा. दामोदर कोसंबी जन्म शताब्दी स्मृती विशेषांक, वर्ष 24, अंक 8, 31 डिसेंबर 2007

अरुणा असफ अली जन्म शताब्दी विशेषांक, वर्ष 25, अंक 5, 19 डिसेंबर 2008

डॉ. लोहिया-बोरकर-सातोस्कर विशेषांक, वर्ष 25, अंक 12, 2009

संत तुकाराम चतु:जन्मशताब्दी विशेषांक, जून 2009

दत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक, वर्ष 25, अंक 15, 15 एप्रिल 2010

स्वातंत्र्यवीर सावरकर विशेषांक, वर्ष 26, अंक 3, 15 ऑगस्ट 2010

कॉ. शामराव मडकईकर गौरव विशेषांक, वर्ष 26, अंक 4, 2010

डॉ. द्वारकानाथ़ कोटणीस जन्मशताब्दी विशेषांक, वर्ष 28, अंक 4, डिसेंबर 2011

कॉम्रेड श्रीकांत लाड स्मृती विशेषांक, वर्ष 28, अंक 8, 2012

कॉ. प्र. श्री. नेरूरकर जयंती विशेषांक, वर्ष 28, अंक 13, 2013

कवीवर्य मनोहर नाईक गौरव विशेषांक, वर्ष 28, अंक 15, नोव्हेंबर 2013

इतिहास संशोधक स.शं.देसाई स्मृती विशेषांक, वर्ष 28, अंक 18, ऑक्टोबर 2014

साथी पीटर अल्वारीस स्मृती विशेषांक, वर्ष 29, अंक 15,

कॉ. गोविंद पानसरे स्मृती विशेष, वर्ष 29, अंक 19, नोव्हेंबर 2015

कॉ. गुलाबराव गणाचार्य आणि कॉ. दादा पुरव स्मृती विशेषांक, वर्ष 31, अंक 3, नोव्हेंबर 2017

परिशिष्ठ २
‘लोकभूमी’कडून प्रकाशित पुस्तके


1.बुद्ध आपुला सांगाती (ले. नारायण देसाई)-2005
2.शिवाजी त्यांचा, शिवाजी आमचा (ले. अर्जुन जयराम परब)-2005
3.ज्ञानदीप लावू जगी (ले. अर्जुन जयराम परब)-2006
4अंधश्रद्धा : एक विवेकनिष्ठ विवेचन (ले. यज्ञेश्‍वर निगळ्ये) - 2008
5. मद्यपाश : एक आजार (ले. डॉ. रूपेश पाटकर) - 2011
6. Superstition : A Radical Discourse (Yadneshwar  Nigale)- 2012
7. Steps Needed to boost Agricultural Production in Goa (H.Y.Karapurkar)-2012
8. गोव्याच्या शेतीला नवसंजीवनी (ले. हेमन कारापुरकर) - 2013
9. ऊर्जा - विद्यार्थी स्वाध्याय संकलन (संपा. कुलदीप कामत) -2015